श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राहाता तालुक्यातील चितळी येथे एका तरुणाच्या घरात एका १३ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. या मुलीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या घरात मृतदेह मिळून आल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मुलीचे कुटुंबीय व नातेवाईकांनी आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे.
गुरुवारी (दि. १९) सायंकाळी चितळी येथील आकाश राधू खरात (वय २५) या तरुणाच्या घरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत असल्याची माहिती श्रीरामपूर पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचासमक्ष मृतदेह खाली उतरविण्यात आला. त्यानंतर श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शुक्रवारी सकाळीच पुन्हा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेतील फरार आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान शुक्रवारी श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊ शकले नाही. त्यामुळे या मुलीचा मृतदेह अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे पोलीस निरीक्षक साळवे यांनी सांगितले.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच ठोस माहिती देता येईल. त्यानंतरच गुन्ह्याच्या तपासाची दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती निरीक्षक साळवे यांनी ‘लोकमत’ला दिली.
----------
तो तरुण राहत होता एकटाच
आकाश खरात हा तरुण आजीसोबत चितळी येथील त्याच्या घरी रहात होता. त्याचे कुटुंबिय औरंगाबाद येथे रहाण्यास असून, त्याची आजीही काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे गेली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून हा तरुण एकटाच घरी होता. दरम्यान या घरात मृतदेह आढळून आला तेव्हा तो तरुण घरात नव्हता. गावातील ग्रामस्थांनी घरात मृतदेह असल्याचे पोलीस ठाण्यात कळविले होते. त्यावरुन पोलीस घटनास्थळी पोहोचले, असे पोलीस निरीक्षक साळवे यांनी सांगितले.