पाथर्डी : ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व श्री तिलोक जैन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पाथर्डी शहरात घेतलेल्या रक्तदान शिबिरास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिबिरात ५१३ जणांनी रक्तदान केले.
संस्थेचे सचिव सतीश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त धरमचंद गुगळे, राजेंद्रकुमार मुथा, डॉ. ललीत गुगळे यांनी सध्या रक्ताची गरज ओळखून शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, शिव प्रतिष्ठान सुवर्णयुग तरुण मंडळ आदींनी शिबिरात सहभाग घेतला. श्री तिलोक जैन परिवारात तीनशे शिक्षक कार्यरत आहेत, तसेच सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सतीश गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी आराखडा तयार करून प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थांच्या पालकांशी संपर्क साधून पालकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. पंधरा दिवस या रक्तदानाचे नियोजन चालू होते. ज्या शिक्षकाने पालकांशी संपर्क साधला व जे रक्तदान करण्यासाठी तयार झाले त्यांची यादी तयार करण्यात आली. सकाळी श्री आनंद कॉलेज येथे शिबिराचे उद्घाटन पार पडले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे होते. राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज, ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.