अहमदनगर : राज्यातील रक्ताची गरज लक्षात घेऊन ‘लोकमत’ २ जुलैपासून राज्यभर ‘रक्ताचं नातं’ हे महाअभियान सुरू करत आहे. नगर शहरात जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन होणार आहे.
‘लोकमत’चे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिबिरांचा प्रारंभ होत आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मंत्री गडाख व भोसले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. तर, ‘लोकमत’ व प्रहार संघटना यांच्या वतीने मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिराचे उद्घाटन औरंगाबाद रस्त्यावरील प्रहार ॲकॅडमीत दुपारी १२ वाजता पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ही दोन्ही शिबिरे सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
या शिबिरांत सहभागी होण्याचे आवाहन लोकमत, आनंदऋषी रुग्णालयाची रक्तपेढी, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, संतोष पवार व जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीने केले आहे.
----------------
रक्तदान शिबिराचे असे आहे वेळापत्रक
२ जुलै - आचार्य आनंदऋषीजी महाराज रुग्णालय रक्तपेढी, अहमदनगर
२ जुलै - प्रहार करिअर ॲकॅडमी, नगर-औरंगाबाद रोड
४ जुलै- लाड हॉस्पिटल, खर्डा, ता. जामखेड
५ जुलै- अहमदनगर बाजार समिती, नेप्ती
६ जुलै- रत्नकमल मंगल कार्यालय, श्रीगोंदा
७ जुलै- ल.ना. होशिंग विद्यालय, जामखेड
८ जुुलै- साई संस्थान हॉस्पिटल, शिर्डी
११ जुलै- मराठा पंच कार्यालय, कोपरगाव
१२ जुलै - पंचायत समिती सभागृह, नेवासा
१३ जुलै- जिल्हा परिषद शाळा, कर्जत
१४ जुलै- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृह, संगमनेर
१९ जुलै- आनंद कॉलेज, पाथर्डी
२० जुलै- आगाशे सभागृह, श्रीरामपूर
-----------
हे करू शकतात रक्तदान
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्ती
- कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
- लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी रक्तदान करता येते
-------------
सामाजिक संघटनांना आवाहन
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देतानाच त्यांची उचित नोंद ‘लोकमत’ घेणार आहे. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी संघटना, सामाजिक संघटनांनीही या मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.