अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज नगर येथे झालेल्या प्रचार सभेत काळे कपडे घातलेल्या महिला, पुरूषांना प्रवेश नाकारण्यात आला. बुरखाधारी महिला, तसेच काळ्या ओढण्या असलेल्या महिलांनाही सभेपासून रोखण्यात आले. े पाण्याच्या बाटल्याही गेटवरच काढून घेण्यात येत होत्या. अहमदनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सकाळी अकरा वाजता सावेडीतील संत निरंकारी भवनाजवळील मैदानात सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला जिल्हाभरातून लोक आले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच सभास्थळाकडे नागरिक जमा होत होते. सभास्थळी महिला व पुरूषांसाठी एकत्रित ३० गेटमधून प्रवेश दिला जात होता. परंतु यावेळी पोलिसांकडून लोकांची कसून तपासणी केली जात होती. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त प्रवेशद्वारावर होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकांनी पाण्याच्या बाटल्या बरोबर आणल्या होत्या. परंतु पोलिसांनी या बाटल्या गेटवरच काढून घेतल्या. मोकळी असो वा भरलेली पाण्याची बाटली सभामंडपात न्यायची नाही, अशा सक्त सूचना असल्याने सर्व बाटल्या गेटवरच काढून घेण्यात आल्या. परिणामी पाण्याच्या बाटल्यांचा भलामोठा खच गेटवर जमा झाला. काळे कपडे घातलेल्या व्यक्तींनाही पोलीस प्रवेश नाकारत होते. बुरखाधारी महिलांना चक्क मागे जाण्याची वेळ आली. ज्या मुली, महिलांनी काळी ओढणी परिधाण केली होती, त्यांना ओढणी गेटवरच काढून ठेवण्याचे पोलीस सांगत होते. यात काही महिलांनी ओढणी काढूनही ठेवल्या. परंतु अनेकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. काळे कपडे नेमके का नाकारले जात होते, हे अनेकांना समजले नाही. पोलिसांनीही त्याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
काळे कपडे घातलेल्यांना मोदींच्या सभेला नो-एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:03 IST