अकोले : पूर्वीच्या सरकारच्या काळात योजनेच्या एक रुपयातून केवळ पंधरा पैसे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असे. परंतु भाजप सरकारच्या काळात स्थिती बदलली असून भ्रष्टाचार कमी झाल्याने वंचित घटकांपर्यंत योजनेचे पूर्ण पैसे पोहचतात, असा दावा करत शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी पीक विमा योजनेबरोबर अन्य सरकारी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांचे जेष्ठ बंधू सोमाभाई मोदी यांनी केले.अकोले येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची साई संस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल अकोलेकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे, सरस्वती वाकचौरे, अॅड. वसंत मनकर, शिवाजी धुमाळ, सोनाली धुमाळ-नाईकवाडी, रमेश राक्षे, मच्छिंद्र मंडलिक, भाऊसाहेब आभाळे, नानासाहेब दळवी, अनिल कोळपकर, माणिक देशमुख, सलीमखान पठाण, बाबासाहेब नाईकवाडी, रामहारी चौधरी, सुरेश करवा, डॉ. अमित काकड आदी उपस्थित होते. एक रुपयात आम आदमी विमा, शेतकरी पीक विमा, केवळ ५० रुपयांत वंचितांच्या घरात वीज, उज्ज्वल गॅस, फळबाग योजना आदी कल्याणकारी योजनांमुळे या सरकारने जनमानसात आशादायी चित्र निर्माण केल्याचे सोमाभाई यांनी स्पष्ट केले. शिर्डी देवस्थान जगाच्या नकाशावर असून येत्या काळात सरकारच्या मदतीने मंदिर परिसराचा कायापालट करू, असा विश्वास भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला. तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी प्रास्ताविक केले. बबलू धुमाळ यांनी सूत्रसंचालन, तर भाऊसाहेब पुंजा वाकचौरे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)कार्यक्रमात गाणगापूर येथून आलेल्या एका साधूने सोमाभाई यांच्याकडे वाकचौरे यांची शिफारस केली. पंतप्रधान मोदींना सांगून वाकचौरे यांना केंद्रात अनुसूचित जाती जमाती कमिटीत चांगले स्थान द्या, असे ते म्हणाले. त्यावर सोमाभाई नम्रपणे म्हणाले, ‘मी नरेंद्रभाई यांचा भाऊ आहे, पंतप्रधानांचा नाही.’ राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. मी जमेल तेवढे छोटे-मोठे समाजकार्य करतो. सरकारच्या योजना आवडल्या तर कधीतरी लोकांपर्यंत भाषणातून पोहोचवतो. साईबाबा दर्शनाच्या निमित्ताने वाकचौरे यांच्याशी मैत्री झाली हेच येथे येण्याचे कारण.
भाजप तळागाळापर्यंत पोहोचला
By admin | Updated: September 27, 2016 23:55 IST