सोनई : मुळा सहकारी साखर कारखान्याकडून उसाच्या उपपदार्थातून होणाऱ्या नफ्यातून शेतकऱ्यांना २ हजार ८०० रुपये प्रति टन भाव मिळावा यासाठी नेवासा भाजपच्या वतीने कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी सकाळी उपोषण करण्यात आले. कारखाना पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर दुपारी दीड वाजता उपोषण सोडण्यात आले.
यावेळी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, सचिन देसरडा, ऋषीकेश शेटे, स्वप्निल सोनवणे, अंकुश काळे, लक्ष्मण माकोणे, अरुण गाडेकर, विश्वास कर्जुले, आदी उपस्थित होते. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. परंतु, मुळा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाने भाव वाढीबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा न केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. असे म्हणत सोमवारी भाजपच्या वतीने सोमवारी मुळा कारखान्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, संचालक बापूतात्या शेटे, भाऊसाहेब मोटे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.