अहमदनगर: नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याची बुधवारी बँकेच्या नगर येथील मुख्य शाखेत लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यावेळी पाच पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने निघाल्याने लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेले सराफ निघून गेले.
लिलाव बाकी असलेले उर्वरित कोट्यावधी रुपयांचे सोनेही बनावट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बुधवारी लिलावासाठी 364 पिशव्या आणण्यात आल्या होत्या. तारण ठेवलेल्या या सोन्यावर बँकेने कोट्यवधी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. प्रत्यक्षात मात्र बनावट सोन्याच्या माध्यमातून कर्ज वितरित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अर्बन बँकेत कोट्यवधी रुपयांचा सोनेतारण अपहार समोर आला आहेत. दरम्यान तारण असलेल्या सर्व सोन्याचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान अर्बन बँकेतील कर्ज वितरणातील अनियमितता, वसुली ऑडिट रिपोर्ट आदी संदर्भात बँकेचे सभासद राजेंद्र गांधी, पोपोट लोढा, भैरवनाथ वाकळे, अनिल गट्टाणी यांनी बँकेचे प्रशासक महेंद्रकुमार रेखी यांना जाब विचारला त्यांनी मात्र सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे न देता ते कार्यालयातून निघून गेले. यावेळी सभासदांनी तीव्र संताप व्यक्त केला.