अहमदनगर : सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध भागात केलेल्या १ लाख १३ हजार वृक्ष लागवडी पैकी ९५ टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा केला आहे. ही लागवड जिल्ह्यातील विविध तालुक्यात १०२. ३० किलोमीटरवर करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक संचालक एल.बी. बामबर्से यांनी दिली. बिहार पॅटर्नमुळे लागवड केलेली रोपे जगवता आली असे त्यांनी स्पष्ट केले. २०१५-१६ या वर्षभराच्या कालावधीत सामाजिक वनीकरण विभागाने नरेगा (महात्मा गांधी रोजगार हमी), राज्य योजना आणि कॅम्प अंतर्गत ही १ लाख १३ हजार वृक्ष लागवड केली होती. रोहयोतून ९० किलोमीटर लांबीवर रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात आली आहे. गट लागवड पध्दतीत १४. ४५ हेक्टरवर लागवड करण्यात आली असून कॅम्प अंतर्गत १२ किलोमीटरवर गट लागवडीत गावातील गायरान जमिनीवर ही लागवड झालेली आहेत. यात एका हेक्टरवर १ हजार १०० वृक्षाची लागवड करण्यात येते. जिल्ह्यात १०२.३० किलोमीटरवर आणि १६ हेक्टरवर १ लाख १३ हजार वृक्ष लागवड करण्यात आली असल्याचे बामबर्से यांनी सांगितले. यातील जवळपास ९५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याला बिहार पॅटर्न कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
बिहार पॅटर्नने जगविली ९५ टक्के रोपे
By admin | Updated: April 22, 2016 00:11 IST