अहमदनगर : नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावाजवळील सोढाळा नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम भूमिपुत्रांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमातून गाव भविष्यात हरित होण्याचे संकेत आहेत. पावसाअभावी सहा वर्षापासून रुईछत्तीसी भागात दुष्काळीस्थिती आहे. शेतकऱ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे या ध्येयाने गावातील विविध पदांवर काम करणारांची यादी तयार करुन व्हॉटस्अपवर ‘आम्ही रुईकर’ हा ग्रुप स्थापन केला. व गावात जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेतला. सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी धर्माजी भांबरे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी भानुदास हजारे, अॅड. लक्ष्मण गोरे, ग्रामविकास अधिकारी अशोक जगदाळे, ज्ञानेश्वर हजारे, शिक्षक दत्तात्रय काळे, विकास गोरे, गोरख गोरे, पांडुरंग गोरे, जालिंदर खाकाळ, चंद्रकांत भवर, सुभाष गोरे, संतोष भवर, संतोष भांबरे, दादाराम हजारे यांनी पुढाकार घेऊन अडीच लाखाचा निधी गोळा करुन नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचा निर्णय घेतला व या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते झाला. आंबिल ओढ्यावरील बंधारा गाळाने भरला असून हा गाळ काढण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. त्यासाठी निम्मा आर्थिक भार उचलण्याचे ठरले. शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाल्यास संपूर्ण शिवारात जलसंधारणाची कामे करण्याचा मानस या भूमिपुत्रांचा आहे. सेवानिवृत्त कृषी अधिकारी भानुदास हजारे यांचे चिरंजीव प्रवीण व अक्षय यांनी यासाठी १ लाख ५१ हजाराची देणगी दिली. गावातील मंडळे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
जलसंधारणासाठी भूमिपुत्र सरसावले!
By admin | Updated: July 20, 2016 00:18 IST