ही घटना रविवारी (दि.१७) सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात मंगेश बाळासाहेब जगताप (वय ४५, रा. दशरथवाडी, ता. कोपरगाव) यांच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळाहून कारसह पसार झाला होता. पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के, अंबादास वाघ, राघव कोतकर यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांच्या मदतीने जखमीस उपचारासाठी कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
या प्रकरणी जखमीची पत्नी लक्ष्मी मंगेश जगताप (वय २९, रा.दशरथवाडी ता. कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार व कार चालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोपरगावहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर, पुन्हा कोपरगावच्या दिशेने फरार झाला आहे. अपघातग्रस्त कार दुरुस्तीसाठी आल्यास तत्काळ कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के यांनी केले आहे.