मुळा भंडारदरा आणि निळवंडे या तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपूर्वी पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतली होती. इतरत्र जोरदार पाऊस कोसळत असताना पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या घाटघर, रतनवाडी, पांजरे आणि हरिश्चंद्रगडाच्या पर्वत रांगांत पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. गुरुवारपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरण भरण्याची प्रतीक्षा जवळपास संपली. सध्या मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आणि धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली.
शनिवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणात २३६ दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक झाली आणि ११ हजार ३९ दशलक्ष घनफुट क्षमता असणाऱ्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा १० हजार ५५९ दशलक्ष घनफुटापर्यंत पोहोचला. कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगातही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. प्रवरेची उपनदी म्हणून समजल्या जाणारी कृष्णावंती नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे. वाकी येथील लघू पाटबंधारे तलावावरून ७८९ कुसेकने पाणी नदीपात्रात पडू लागले. निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून आहे. निळवंडे धरणात दिवसभरातील बारा तासांत ११४ दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा ६ हजार ७७८ दशलक्ष घनफुट झाला. धरण ८१ टक्के भरले.
.............
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे या धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शनिवारी दिवसभरात पडत असलेल्या पावसाचा अंदाज लक्षात घेता भंडारदरा धरण रविवारी दुपारनंतर पूर्ण क्षमतेने भरणार आहे.
-अभिजित देशमुख, उपअभियंता जलसंपदा विभाग, अकोले.