संगमनेर (जि. अहमदनगर) : दुधाच्या नावाखाली टेम्पोतून गोमांस वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे गोमांस नाशिक जिल्ह्यातील मालेगावहून मुंबईला नेण्यात येत होते. संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार टन गोमांस व वाहतुकीकरिता वापरला जाणारा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. २७) पहाटे नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर करत मुंबईतील टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले.
नाथा मनोहर रसाळ (४२, रा. खोली क्रमांक ६९, उमरवाडी, सहारा झोपडपट्टी, सेवा संघ कुर्ला, कुरेशीनगर, मुंबई, हल्ली रा. चितागेम ट्राम्बे करमरा मैदान, मानखुर्द मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यमना नामदेव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना दुधाच्या वाहनातून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गोमांस वाहतूक होत असलेल्या वाहनावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी टोल नाका येथे वाहनांची तपासणी करत असताना दूध नाव लिहिलेल्या चॉकलेटी व पांढऱ्या रंगाच्या आयशर टेम्पोची (एमएच ०३ सीपी ८८५८) तपासणी पोलिसांनी केली. या टेम्पोत मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत तालुका पोलीस ठाण्यात नेले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हे गोमांस मालेगावहून मुंबईला नेण्यात येत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. टेम्पो चालक नाथा रसाळ विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. चार लाख रुपये किमतीचे चार टन गोमांस व ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाईवेळी जप्त करण्यात आला. पोलीस हेड काॅन्स्टेबल एस. एस. पाटोळे अधिक तपास करीत आहेत.
----------
फोटो नेम : २७१२२०२० गोमांस वाहून नेणारा टेम्पो
ओळ : गोमांस वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला दूध नाव लिहिलेला टेम्पो.