भेंडा/अहमदनगर : नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथील दोघा शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी शेतात घेतल्याने पोलिसांनी शुक्रवारी बेदम मारहाण केली़ त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीच्या निषेधार्थ शनिवारी शेतकऱ्यांनी कुकाणा पोलीस चौकीसमोर आंदोलन केले. शेतीसाठी मुळा धरणातून आवर्तन सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला. पाथरवाला येथील स्वामी समर्थ पाणीवापर संस्थेने शंभर एकर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी नोंदवली होती. संस्थेच्या पाच सभासदांचे पाणी भरणे राहिले होते. भरणे होईपर्यंत पाणी चालू ठेवावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ खाटिक व संतोष खाटिक यांनी कालव्याचे पाणी शेतात घेतले़ पाणी घेण्यास पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी विरोध केला़ तसेच पोलिसांना माहिती दिली़ दोघा पोलीस हवालदारांनी हरिभाऊ खाटिक व संतोष खाटिक यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही शेतकरी जबर जखमी झाले आहेत़ दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ (प्रतिनिधी)
कालव्याचे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण
By admin | Updated: March 26, 2017 02:47 IST