नेवासा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आषाढी पायी दिंडीची परंपरा खंडित झाली असली तरीही ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांना चंद्रभागेत स्नान घालण्यात आले. यावेळी राष्ट्रसंत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी माउलींच्या पादुकांचे सपत्नीक विधिवत पूजन केले.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पन्नास वर्षांची पायी दिंडी परंपरा खंडित झाली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांनी चंद्रभागेत माउलींच्या पादुकांचे जलाभिषेक घालून पूजन केले. पादुका डोक्यावर ठेऊन त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा घालून आपली वारी पूर्ण झाल्याचे समाधान मानले. यावेळी गुरुवर्य बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी सपत्नीक पूजन केले.
पंढरपूर येथील संत तुकाराम महाराज मंदिरात संत तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज मोरे यांनी शिवाजी महाराज देशमुख यांचे स्वागत केले. माउलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन पूजन केले. यावेळी संतसेवक शिवाजी होन, युवा कीर्तनकार राम महाराज खरवंडीकर, संदीप आढाव उपस्थित होते.
-----
१२ नेवासा दिंडी
नेवासा येथील संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांना पंढरपूर येथे चंद्रभागेत स्नान घालण्यात आले. यावेळी शिवाजी महाराज देशमुख व इतर.