याप्रकरणी प्रकाश वाईन्सचे व्यवस्थापक अशोर बशीर शेख (वय २९ रा.पंचवटी नगर भिस्तबाग चौक, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हे रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास दुकानातील पैसे बॅगमध्ये घेऊन जात होते. ते दुकानापासून काही अंतरावर जाताच विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवरून दोघे जण आले. यातील एकाने शेख यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला. असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर शेख यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी तोफखाना ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक किरण सुरसे, रवींद्र पिंगळे यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली. याप्रकरणी सहायक निरीक्षक पिंगळे हे पुढील तपास करत आहेत.
-------------------
धूमस्टाईलने ओरबाडले दागिने
शहरातील पाइपलाइन रोडवरील गोकुळनगर येथे घरासमोर उभा असलेल्या महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी ओरबाडली. याच वेळी काही अंतरावर रस्त्याने जात असलेल्या एका तरुणाच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची चेन याच चोरट्यांनी ओरबाडून नेली. चोरट्यांनी चेन ओरबाडली तेव्हा महिलेच्या गळ्याला दुखापत झाली. रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात लक्ष्मी नरसैय्या गाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केला चोरट्यांचा पाठलाग
या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तत्काळ शोध घेत चोरट्यांचा पाठलाग केला. नगर-पुणे रोडवरील थेट चास शिवारापर्यंत पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र रस्त्यावर मध्येच दोन ट्रक आले. याच संधीचा फायदा घेत चोरटे दिसेनासे झाले. या गुन्ह्याचा पोलीस उपनिरीक्षक सोमाधान सोळंके हे पुढील तपास करत आहेत.