संगमनेर : दोघांमध्ये वाद होऊन तरुणाने पैसे घेणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ५ सप्टेंबर २०१८ ला निमगावजाळीत घडली होती. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल होता. वार करणाऱ्या तरुणाला येथील जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी पाच वर्षे कारावास तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर दोघांना निर्दोष मुक्त केले.
सतीश दशरथ आरगडे (वय ३४ वर्षे, रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यातील आरोपी अजय ऊर्फ गणपत शिवाजी वदक आणि शोभा शिवाजी वदक अशी निर्दोष मुक्त केलेल्या दोघांची नावे आहेत. संभाजी सुखदेव आरगडे यांनी या प्रकरणात फिर्याद दिली होती. २०१७ ला त्यांचे बंधू शिवाजी आरगडे यांनी सतीश आरगडे याच्याकडून दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. सतीश आरगडे हा त्यांच्याकडे वाढीव व्याजाची मागणी करत असताना त्यावरून दोघांमध्ये वाद झाले होते.
त्यानंतर ५ सप्टेंबर २०१८ ला सकाळी साडेसातच्या सुमारास निमगावजाळी शिवारात सतीश आरगडे याने शिवाजी आरगडे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या शिवाजी आरगडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आश्वी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. त्यांनी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गुन्ह्यात एकूण तेरा जणांची साक्ष नोंदविण्यात आली. शुक्रवारी (दि. २४) न्यायाधीश घुमरे यांनी या गुन्ह्याचा निकाल देत आरोपी सतीश आरगडे याला पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून ॲड. बी. जी. कोल्हे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील सरोदे, पोलीस हेड कॉस्टेबल प्रवीण डावरे यांनी काम पाहिले.