अहमदनगर : माळीवाडा येथील अॅड. वसंत केशव पालवे यांना दोन महिलांसह सात जणांनी रिव्हॉल्व्हर आणि तलवारीचा धाक दाखवून पळवून नेले. पालवे यांना माणिक चौकातून उचलून बालिकाश्रम रोडवरील एका शेतात मारहाण केली. त्यांच्याकडील २० हजार रुपये हिसकावून घेतले. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माळीवाडा भागातील इवळे गल्लीत राहणारे अॅड. वसंत पालवे हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात असताना तीन दुचाकीवरून आलेल्या सात जणांनी त्यांना माणिक चौकात अडविले आणि मारहाण केली. यामध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. रिव्हॉल्व्हर आणि तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील २० हजार ३६० रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. त्यांना बळजबरीने बालिकाश्रम रोडवरील एका शेतात नेले. तेथेही पालवे यांना मारहाण केली. सात जणांनी पालवे यांच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या आणि अंगठे घेतले. त्यानंतर मनमाड रोडवरून नेत एका ठिकाणी डांबले. पालवे यांना मारहाण करून खून करण्याची धमकी दिली. यावेळी अॅड. पालवे यांनी कशीबशी सात जणांच्या गराड्यातून सुटका करून घेतली.या प्रकरणी पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध मारहाण, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र देव, निनाद देव, सुनीता देव (रा. चितळे रोड), अनिता पोटे (रा. श्रीराम चौक, पाइपलाइन रोड), विवेक बडे (रा. समर्थ नगर, पुणे), प्रमोद बाबासाहेब त्रिंबके (रा. बोल्हेगाव), उत्तम त्रिंबके (रा. बुरुडगाव रोड) अशी सात जणांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)
अपहरण करून वकिलाच्या खुुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2016 23:39 IST