अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यात आधी लावण्यात आलेले अँट्रॉसिटीचे कलम वगळण्यास रिपब्लिकन पार्टीचे नेते खासदार रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. हत्याकांडातील संशयित म्हणून ज्यांची चौकशी झाली, ते अन्य जाती-धर्मातील आहेत. त्यामुळे सदर कलम वगळण्याबाबत पोलिसांनी घाईने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
नगर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जवखेडेच्या घटनेला एक महिना आठ दिवस लोटले आहेत. पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यात अपयश आले आहे. आरोपीच सापडले नाहीत तर कलम वगळण्याबाबत पोलीस निष्कारण घाई करीत आहेत. खर्डा येथील हत्या जातीयवादी भावनेतूनच झाली होती. जोपर्यंत कारणे, पुरावे आणि आरोपी सापडत नाहीत, तोपर्यंत अँट्रॉसिटीचे कलम वगळण्याचे काहीच कारण नाही. या तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स नियुक्त केला जावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पोलिसांना आता भरपूर वेळ दिल्याने तपास सीबीआयकडे देण्याची गरज आहे.
दलितांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस गंभीरपणे तक्रार दाखल करून घेत नाहीत. त्याचवेळी त्यांनी तपास केला तर पुढील घटना घडणार नाहीत. दलित अत्याचाराच्या घटना ज्या भागात संख्येने जास्त आहेत, अशा भागात पोलीसबळ वाढवावे. दलितांचे संरक्षण करण्यास पोलीस सक्षम नसतील तर स्वसंरक्षणार्थ दलितांना हत्यारे वापरण्याची परवानगी द्यावी. दलित अत्याचाराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक समिती नियुक्त करून त्याची तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे आठवले यांनी सांगितले. दलितांवर अत्याचाराची प्रकरणे देशभर घडत आहेत. ही नीच मानसिकतेची लक्षणे आहेत. त्यावर कसे बंधन आणायचे, याचा सरकारने विचार केला पाहिजे. अँट्रॉसिटीचे कलम रद्द करावे, ही सत्यशोधन समितीची मागणी चुकीची आहे. त्या मागणीला काहीच अर्थ नाही. अत्याचाराच्या घटनांबाबत मागील सरकारपेक्षा आताचे सरकार जास्त गंभीर आहे, असेच गंभीरपणे सरकारने काम करावे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)