केडगाव : आमदार निलेश लंके यांचे नाव शरदचंद्र पवार कोविड सेंटरच्या माध्यमातून देशभरात पोहोचले आहे. त्यामुळे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार लंके यांना संधी द्यावी, अशी मागणी नगर-पारनेर तालुक्यातून होत आहे. श्री साई संस्थानच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात यावी, याबाबतचा ठराव नगर तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीने केला आहे, अशी माहिती सरपंच प्रवीण कोठुळे यांनी दिली.
निलेश लंके यांनी कर्जुले हर्या व भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरच्या (कोविड सेंटर) माध्यमातून हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे. लंके यांच्या कामाची दखल पक्षाध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशातील इतर राज्यांनीही घेतली आहे. त्यांच्या कोविड सेंटरमधून अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील लोक उपचार घेऊन घरी गेले आहेत. त्यामुळे समाजसेवा करणारे लंके यांची श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशा मागणीचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार असल्याचे सरपंच कोठुळे यांनी सांगितले.