साई संस्थानमध्ये गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून विविध विभागात पावणेतीन हजार कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये डॉक्टर, परिचारीका, वॉर्डबॉय, वाहन चालक, शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, लिपीक, तारतंत्री, सॉफ्टवेअर इंजिनियर इत्यादींचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी संस्थानचे कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच शैक्षणिक पात्रता धारक व उच्च शिक्षित आहेत. मात्र, या सर्वांना कायम कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिशय तुटपुंजे व कमी वेतन दिले जात आहे. संस्थानने शासनाचे समान काम समान वेतनाचे परिपत्रकाची व कामगार कायद्याची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. नगरच्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी परिपत्रकाचे अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. कामगारांनी संस्थानकडे पाठपूरावा केल्यानंतर संस्थानने २०१५ मध्ये याबाबत शासनाकडे पाठवलेला प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे कंत्राटी कर्मचा-यांवर अन्याय होत आहे. शासनाच्या न्याय व विधी विभागाने समान काम समान वेतनाच्या प्रस्तावाला तत्काळ मान्यता द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालूकाध्यक्ष सुधीर म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, माजी जिल्हाध्यक्ष अमित शेळके, गणेश गोंदकर तसेच साईबाबा संस्थान असंघटीत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कोते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
( १६ तटकरे)