अहमदनगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळाचा फटका नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील महिलेला बसला आहे. अंगावर भिंत पडून जखमी झालेल्या शांताबाई गिते या ठार झाल्या आहेत. यामुळे वादळात मृत झालेल्याची संख्या सातवर पोहचली आहे. नेवासा, नगर तालुक्यात गुरूवारी सायंकाळी झालेल्या वादळात आणखी ४९ घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २ जून पासून वादळी वाऱ्यांसह पावसाचा तडाखा बसत आहे. यात यापूर्वी सहा जणांचे बळी गेले आहे. गुरूवारी आणखी एक महिलेचा बळी गेलेला आहे. वादळी पावसात वीज पडून अथवा जखमी होणाऱ्यांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. वादळात अंशत: घराचे नुकसान होणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील प्रती व्यक्ती प्रमाणे एक हजार रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार तर पूर्णपणे पडणाऱ्या घरांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)केशवशिंगवेला वादळाचा तडाखाकरंजी : पाथर्डी तालुक्यातील केशवशिंगवे गावाला मान्सूनपूर्व पाऊस व वादळाचा मोठा तडाखा बसला आहे़ यात बारा घरे पडली असून सुमारे पंधराजण जखमी झाले आहेत. वादळाच्या तडाख्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून लाखोंचे नुकसान झाले आहे. केशवशिंगवे येथे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता वादळ आणि गारपिटीमुळे दलित वस्तीमधील बारा घरकुलांंचे पत्रे उडाले. या पडझडीमध्ये सुमारे पंधराजण जखमी झाले आहेत. कमल पायमोडे या महिलेच्या अंगावर भिंत पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत़ गंगाधर भवार, सुमन शेलार, अनिता शेलार, उर्मिला पेटारे, विकास शेलार, निकिता शेलार यांना जबर मार लागला आहे. तसेच अनेक गोठ्यांवरील पत्रेही उडाले असून, तीन शेळ्या व दोन गायी मृत झाल्या आहेत. या वादळाचा फटका संपूर्ण गावाला बसला असून घरांचे व कांद्याच्या शेडवरील पत्रे दोन किलोमीटरपर्यंत लांब जाऊन पडले़ मोठ-मोठी झाडेही उन्मळून पडली. गुरूवारी सायंकाळ पासून सुरू झालेल्या वादळी पावसाचा तडाखा नगर, नेवासा आणि पाथर्डी तालुक्यातील काही भागांना बसला आहे. नेवासा तालुक्यातील दोघे जखमी झाले असून ३ घरे, नगर तालुक्यातील गुणवडी येथील ७ घरे, जेऊर १०, धनगरवाडी येथील १३, राळेगण म्हसोबा येथील १६ घरांचे नुकसान झालेले आहे.नेवासा तालुक्यातील चांदा, रास्तापूर, शास्त्रीनगर, तिरमलवाडी, कौठा, तेलकुडगाव, माका या ठिकाणी वादळामुळे शेकडो घरांचे नुकसान झालेले आहे. या भागाची तहसीलदार हेमलता बडे आणि जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी पाहणी केली. या ठिकाणी अंदाजे शेती, फळबागा, घरे,जनावरे असे सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची भीती दहातोंडे यांनी व्यक्त केली आहे. शासनाने त्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
वादळाचा आणखी एक बळी
By admin | Updated: June 7, 2014 00:19 IST