लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : भाजपाचा श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद नगरविकास खात्याने रद्द केल्याने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक -९ क मधील पोटनिवडणुकीपूर्वीचा मतदार यादीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला. अंतिम मतदार यादी येत्या ३ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नगरविकास खात्याने छिंदम याचे नगरसेवक पद रद्द केले आहे. या निर्णयाविरोधात छिंदमने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली. दरम्यान, निवडणूक आयोगाने अहमदनगरसह राज्यातील विविध महापालिकांच्या पोटनिवडणुकांपूर्वीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक ९ मधील मतदारांची प्रारूप मतदार यादी येत्या १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, मतदार यादी ३ मार्च रोजी अंतिम केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणे, माघारी घेण्याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
पुढील महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. विद्यमान महापौरांची मुदत येत्या जूनमध्ये संपुष्टात येईल. राष्ट्रवादी व भाजपाकडे महापौरपदाचा उमेदवार नाही. प्रभाग क्रमांक ९ क ही जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे या प्रभागातून अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेला उमेदवारी देऊन निवडून आणता येईल. ही पोटनिवडणूक त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे.
....
...असा आहे मतदार यादीचा कार्यक्रम
दि. १६ जानेवारी- प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे.
दि. १६ ते १३ जानेवारी- मतदार यादीवर हारकती नोंदविणे.
दि. ३ मार्च- अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.
दि. १२ मार्च- मतदान केंद्रावर मतदार याद्या प्रसिद्ध करणे.
....