पारनेर : इंदोर येथील राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दूरध्वनीवरुन तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चिंताही व्यक्त केली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भय्यु महाराजांनी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांची भेट घेतली होती.इंदोर येथील राष्ट्रसंत व राजकीय नेत्यांचे गुरू समजले जाणारे उदयसिंह देशमुख उर्फ भय्युजी महाराज यांनी शनिवारी रात्री राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. त्यावेळी हजारे यांच्या प्रकृतीची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशीही केली. सध्या देशातील विषमतावादी परिस्थितीवर त्यांनी सडेतोड चर्चाही केली. शनिवारी रात्री भय्युजी महाराज पुण्यात गेले. त्यानंतर रविवारी पुणे येथून इंदोरकडे जात असताना नगर -पुणे महामार्गावर रांजणगाव गणपती परिसरात त्यांच्या वाहनावर दगडफेकीचा प्रकार घडला होता. तर पहाटे मनमाडजवळ पुन्हा त्यांच्या वाहनावर दगडफेकीचा प्रकार झाला.या प्रकारात महाराज जखमी झाले आहेत. या प्रकाराची माहिती अण्णा हजारे यांना समजताच मंगळवारी सकाळी त्यांनी भय्यु महाराज यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी आपण समाजातील विघातक प्रवृत्तीवर बोलण्यास सुरुवात केल्यामुळे आपल्यावर हल्ला होत असल्याचे सांगताना महाराजांना अक्षरश: रडू कोसळले. अण्णांनी त्यांना तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
अण्णा हजारे-भय्यूजी महाराज भेट
By admin | Updated: May 11, 2016 00:10 IST