कर्जत : तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कार्यालयावर मोर्चा नेऊन धरणे आंदोलन केले. मात्र त्यांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी संबंधित न आल्याने संताप व्यक्त करीत घरी निघून जाण्याची नामुष्की या सेविकांवर आली.एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत तालुक्यात ३७५ अंगणवाड्या आहेत. विविध ठिकाणी ३७५ अंगणवाडी सेविका व ३१५ मदतनीस आहेत. गेल्या चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यात आले नाही. तीन वर्षांपासून बैठक भत्ता मिळाला नाही. आठ महिन्यांपासून बचतगटांच्या पोषणआहार योजनेची बिले काढण्यात आली नाहीत. शिवाय या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी नियमित हजर नसतात. या प्रकाराबाबत त्यांनी अनेकदा येथील कार्यालयात पाठपुरावा केला, मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांनी येथील कार्यालयातील कारभाराबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे येथील गलथान कारभाराला वैतागून त्यांनी गुरुवारी कर्जत येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. मात्र त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी या कार्यालयातील कोणी अधिकारी अगर कर्मचारी कोणी या आंदोलकाकडे फिरकले नाहीत. कार्यालयात कोणी नाही हे समजल्यावर या अंगणवाडी सेविका व मदतनिस घरी निघून गेल्या. जोपर्यंत आमचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत रोज अंगणवाड्यातील मुलांना आहार वाटप करून त्यांना घरी सोडून द्यायचे, असा निर्णय आंदोलक अंगणवाडी सेविकांनी घेतला.
अंगणवाडी सेविकांचा कर्जतमध्ये हल्लाबोल
By admin | Updated: October 7, 2016 00:55 IST