अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने खासगी व शासकीय रुग्णालयांत वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहेत. त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. उपलब्ध रक्तापेक्षा मागणी वाढल्याने रक्तपेढ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने २ जुलैपासून जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. नागरिकांनी या शिबिरात रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना कमी झाल्यानंतर राज्यातही असाच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’चे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून अहमदनगर जिल्ह्यात ‘रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत जिल्हाभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संस्था, संघटना आणि नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २ जुलै रोजी आनंदऋषिजी महाराज हॉस्पिटलच्या रक्तपेढीत या शिबिराचा प्रारंभ होणार आहे. तसेच याचदिवशी प्रहार संघटनेनेही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
‘लोकमत’ व राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी येथील ‘लोकमत’ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----------
का झाली रक्ताची टंचाई ?
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालये रिकामी झाली आहेत. गेल्या दोन-चार महिन्यांपासून कोरोनामुळे थांबलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासते आहे. याशिवाय शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या प्रसूतीमुळेही रक्ताची मागणी वाढली आहे. कडक निर्बंध हटविण्यात आल्याने रस्त्यावर मोठी वर्दळ वाढली असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच कोरोनामुळे दोन-तीन महिने रक्तदान ठप्प होते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, असे नगर शहरातील रक्तपेढीच्या संचालकांनी सांगितले.
------------
कोरोना होऊन गेल्यानंतर...
कोरोना झालेल्यांनाही ४५ दिवसांनंतर रक्तदान करता येते. तसेच लसीकरण झाल्यानंतर १५ दिवसांनंतर रक्तदान करता येते, अशी माहिती रक्तपेढीच्या संचालकांनी दिली आहे.
कोणाला करता येईल रक्तदान...
रक्तदात्याचे वय १८ ते ६५ वर्षे असावे
वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे
हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ टक्केपेक्षा जास्त असावे
रक्तदानापूर्वी आहार घेतलेला असावा
रात्री जागरण झालेले नसावे
रक्तदानापूर्वी वेदनाशामक औषधे घेतलेली नसावीत
पूर्वी केलेल्या रक्तदानास तीन महिने झालेले असावेत
---------