सुपा : पारनेर तालुक्यातील रायतळे येथील सद्गुरू शांतानंद महाराज आनंदाश्रमाचा परिसर आता चकाचक होणार आहे. मंदिर परिसरात सुशोभीकरण व हायमास्कसाठी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती संतसेवक महादेव महाराज काळे यांनी दिली.
रायतळे येथील छोट्याशा टेकडीवर निसर्गरम्य वातावरणात आनंदाश्रम उभा आहे. येथे शांतानंद महाराज समाधिस्थळ, सभा मंडप, अतिथी निवास, कीर्तन हॉल, भोजन विभाग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणखी निधी मिळवून देणार आहे, असे आश्वासन आमदार लंके यांनी येथील भेटीच्या वेळी दिले होते. त्याची वचनपूर्ती करण्यासाठी हायमास्क बसविण्यासाठी १५ लाख रुपये, तर मंदिर परिसरात फरशी बसविणे व सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी १० लाख असा २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे देवस्थानच्या वैभवात भर पडेल, असे महादेव महाराज काळे व मिठू महाराज साबळे यांनी सांगितले.