शेवगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी राजकीय पक्ष मरगळ झटकून कामाला लागले आहेत. गावपातळीवर संघटनात्मक बांधणीसाठी या प्रमुख पक्षांनी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरु केली आहे. शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान, गावागावात राष्ट्रवादीच्या घोंगडी बैठका, भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांच्या बैठका तसेच मतदारांना भेटण्यासाठी वेगवेगळी कारणे शोधत इच्छुक उमेदवार व नेत्यांकडून संपर्कावर भर दिला जात आहे. अगदी अंत्यविधी, दशक्रिया विधीसह सुखदुःखवेळी नेत्यांची उपस्थिती ठळकपणे जाणवत आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी शांत होते. सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली होती; परंतु आता राज्य शासनाने नियम शिथिल केले असल्याने राजकीय पक्षांनीही आपले कार्यक्रम वाढवले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. निवडणुकांबाबत अद्याप निश्चिती नसली तरी राजकीय पक्षाचे नेते जोमाने कामाला लागले आहेत.
शिवसेनेने तालुकाभर शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधून विविध ठिकाणच्या गावात शाखा स्थापन केल्या आहेत. आगामी महिन्यात १५ गावांत आरोग्य शिबीर घेणार असल्याचे तालुका प्रमुख अविनाश मगरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीकडून गावागावात घोंगडी बैठका घेण्यात आल्या आहेत. सोबत पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांनी मतदारसंघात संपर्क वाढवून पक्षसंघटन मजबूत करताना, सुखदुःखात सहभागी होऊन शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्यात गाठीभेटीचे सत्र वाढविले आहे. आमदार मोनिका राजळे यांनी मतदारसंघावरची पकड मजबूत ठेवताना लग्न सोहळे, अंत्यविधी, दशक्रिया विधी, विविध कार्यक्रम व सोहळे, विकास कामाचे उद्घाटन आदींना प्राधान्य देत असल्याने त्यांची उपस्थिती ठळकपणे दिसून येत आहे, तर जनशक्ती आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांची विविध कार्यक्रमातील हजेरी, गाठीभेटीसह, विकासकामांच्या उद्घाटनाचा लावलेला सपाटा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांनी शेवगाव तालुक्यापेक्षा पाथर्डी तालुक्यात अधिक यंत्रणा कार्यान्वित करुन नव्या जोमाने पुन्हा मतदारांशी संपर्क सुरु केला आहे. त्यांनी आमदार रोहित पवारांना पाथर्डीत आणून मुत्सद्दी राजकारणाचा धुरळा उडवून दिला आहे.
-----------
मतदारनोंदणीपासून गाठीभेटीपर्यंत....
प्रमुख पक्षांकडून नवीन मतदारांची नोंदणी जिल्हा परिषद, पंचायत समिती गणनिहाय मोहीम राबविणे, गावागावात शाखेचे फलक लावणे, नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश, आपल्या पक्षाचे ध्येयधोरण लोकांपर्यंत पोहोचविणे, कोरोना काळात केलेले सामाजिक कार्य गावागावात पोहोचविले जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेते सक्रिय झाले आहेत.
---------------
फोटो - २८पाथर्डी १,२
आमदार मोनिका राजळे व पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले मतदारसंघातील कोरोना पीडितांच्या घरी जाऊन विचारपूस केली.