अहमदनगर: बोलेरो वाहनातून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाठलाग करून एकास ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास राहुरी येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी ४ लाख ४६ हजार रूपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली.नगर-राहुरी रोडने बोलेरो वाहनातून दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांना मिळाली होती. माहितीनुसार निरिक्षक धनंजय लगड, कॉ. प्रविण साळवे व बी.एम. चत्तर यांच्या पथकाने नगर-मनमाड रोडवर सापळा लावला. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चॉकलेटी रंगाची बोेलेरो राहुरीच्या दिशेने जाताना दिसली. पथकाने बोलेरो चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. तो मात्र सुसाट राहुरीच्या दिनेशेने पसार झाला. पथकाने तत्काळ त्याचा पाठलाग केला़ पंधरा मिनिट बोेलोरोचा पाठलाग केल्यानंतर राहुरी परिसरात वाहन अडविण्यात आले. यावेळी अनिकेत लोंढे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४ लाख ४६ हजार ३५५ रूपयांची दारू जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. लोंढे याने ही दारू कोठून आणली याची माहिती उत्पादन शुल्कचे पथक घेत आहे. ही दारू राहुरी परिसरातील हॉटेलचालकांना विकण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बोलेरोतून दारूची वाहतूक : एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 15:58 IST