अहमदनगर : शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील महिनाभरापासून दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेने दिल्ली येथे जाऊन सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रविवारी (दि.३) नागपूर येथून वाहनाचे जत्थे दिल्ली येथील आंदोलनात पाठविण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती कॉ. सुभाष लांडे यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातून कॉ. लांडे, अॅड. बन्सी सातपुते, एल. एम. डांगे, बापूराव राशिनकर, आप्पासाहेब वाबळे, भारत अरगडे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण डांगे व सेक्रेटरी कॉ. बन्सी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी नागपूरहून दिल्लीकडे जाणार आहेत.
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व विविध संघटनांच्या वतीने दिल्ली येथील आंदोलनास पाठिंबा देऊन स्थानिक पातळीवर आंदोलने करण्यात आली होती. मात्र दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाबाबतीत केंद्र सरकारची हटवादी भूमिका पाहता हे आंदोलन किती काळ चालणार? हे अनिश्चित असून, शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. आता देशातील सर्व राज्यातून या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी ही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचत असताना अखिल भारतीय किसान सभेने या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे लांडे यांनी सांगितले.