आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील बीएसएनएलकडे असलेल्या जागेचा प्रश्न आगामी लोकसभा अधिवेशनात उपस्थितीत करणार आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधणार असल्याचे खासदार डाॅ. सुजय विखे यांनी सांगितले.
श्रीगोंदा येथे झालेल्या बैठकीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी याविषयाकडे विखे यांनी लक्ष वेधले.
क्रमांक ५४८ डी या नवीन प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गामुळे आढळगावात मोक्याच्या जागांचे महत्त्व वाढले आहे. बावीस वर्षांपूर्वी गावातील मोक्याची २० गुंठे जागा बीएसएनएलकडे वर्ग केली होती. त्यावेळी भरात असलेल्या बीएसएनएलची अधिकारी आणि कर्मचारी वसाहत झाली तर गावाच्या वैभवात भर पडेल, अशी अपेक्षा ठेवून तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी मंडळींनी हा निर्णय घेतला होता. बीएसएनएलने संपूर्ण जागा ताब्यात घेऊन फक्त संरक्षक भिंत बांधली. परंतु, अधिकारी आणि कर्मचारी वसाहत तसेच कार्यालयही झाले नाही. केवळ तीन गुंठे जागेवर मोबाइल मनोरा उभारला असून, उर्वरित जागा मोकळी आहे. ही जागा व्यावसायिक गाळे आणि बाजारतळासाठी आवश्यक आहे. त्यामुळे जागा पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात यावी यासाठी ठवाळ यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
विखे यांनी श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये ठवाळ यांनी हा प्रश्न उपस्थित केला. आगामी लोकसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थितीत करून केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधणार आहे. या प्रश्नाविषयी आढळगाव ग्रामस्थांना दिल्ली येथे येण्याचे निमंत्रण विखे यांनी दिले.
यावेळी ठवाळ यांच्यासह सरपंच शिवप्रसाद उबाळे, मनोहर शिंदे, नितीन गव्हाणे यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.