अहमदनगर : शहरातील विनापरवाना टपरीमार्केट महापालिकेच्या रडारवर आहे. टपरीमार्केट नियमित करून घेण्यासाठी महापालिकेने ६२२ जणांना नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, टपरी मालकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शहरातील टपरीमार्केटवर महापालिकेकडून हातोडा चालविला जणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
शहरात ठिकठिकाणी पत्र्याचे शेड उभारून गाळे भाड्याने देण्यात आले आहेत. हे शेड खासगी जागेत असले तरी त्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. महापालिकेने मध्यंतरी पत्र्याच्या शेडचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानुसार शहरात सुमारे दोन हजार पत्र्यांचे शेड आहेत. हे शेड विनापरवाना आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे टपरीमार्केटवरील कारवाईची प्रशासकीय कार्यवाही थांबविण्यात आली होती. लॉकडाऊन शिथिल झाल्याने महापालिकेने विनापरवाना टपरीमार्केटकडे मोर्चा वळविला. पहिल्या टप्प्यात ६२२ टपारीमार्केट मालकांना गेल्या महिन्यांत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु, टपरी मार्केट नियमित करण्यासाठी महापालिकेकडे एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे दिलेल्या नोटिसांवर येत्या शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. उपायुक्त यशवंत डांगे यांच्यासमोर या सुनावणी घेण्यात येणार आहे. टपरीमालकांचे म्हणणे ऐकूण घेऊन कारवाईचे आदेश दिले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित विनापरवाना टपरीमार्केटच्या मालकांना नोटिसा बजावण्यात येणार असून, यामध्ये सर्वाधिक सावेडी उपनगरातील टपरी मार्केटचा समावेश आहे.
शहरातील अनेक खासगी जागेत टपरीमार्केट उभारण्यात आले आहेत. टपरीमार्कटला कर अकारणीदेखील होत आहे. असे असले तरी टपरीमार्केट नियमित झालेले नाहीत. टपरीमार्केट उभारण्यासाठी मालकांनी महापालिकेची रितसर परवानगी घेतलेली नाही. मालकांना परवानगी घेण्यासाठी मुदतही दिली गेली.परंतु, मालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने कायदेशीर कार्यवाही सुरू केल्याने टपरीमार्केटमध्ये व्यावसाय करणाऱ्यांवर टाच येण्याची शक्यता आहे.
..
नवव्यावसायिक अडचणीत
लॉकडाऊनच्या काळात कमी भांडवलात अनेकांनी टपरीमार्केटमध्ये गाळे भाड्याने घेऊन व्यावसाय सुरू केले. महिन्यांला ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत ते भाडेही भरतात. परंतु, टपरीमार्केट मालकांनी रितसर परवानगी घेतली नाही. त्यामुळे नव्याने सुरू झालेले व्यावसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे.
...
टपरीमार्केटची संख्या वाढली आहे. टपरीमार्केटचे सर्वेक्षण करून परवानगीसाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु, नियमित करण्यासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे येत्या शुक्रवारी सुनावणी घेऊन पुढी कार्यवाही केली जाणार आहे.
-के. वा. बल्लाळ, प्रमुख अतिक्रमण विभाग