अहमदनगर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी अचानक नगर तालुक्यात पाहणी दौरा केला. यावेळी पिंपळगाव लांडगा आणि कौडगाव ग्रामपंचायतीत ग्रामसेवक गैरहजर आढळले. नवाल यांनी हे प्रकरण गंभीर घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगर पंचायत समितीतून देण्यात आली. नवाल यांनी दुपारी तालुक्यातील पिंपळगाव, कौडगाव, मेहकरी या गावाला भेटी देत ग्रामपंचायतीसह प्राथमिक शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्येक वर्गात जात विद्यार्थ्यांची गणित, भाषा विषयांची परीक्षा घेतली. तसेच शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. गुणवत्ता विकासमध्ये आढळलेल्या अप्रगत विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मेहकरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्या ठिकाणी औषधा साठा, शस्त्रक्रिया गृहाची पाहणी करत दाखल रुग्णांशी संवाद साधला. तसेच डॉक्टरांकडून सहकार्य मिळते की नाही, याबाबत विचारणा केली. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. वसंत गारूडकर उपस्थित होते. पिंपळगाव आणि कौडगाव येथे गैरहजर आढळलेल्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तालुका आणि गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना दर शनिवारी जिल्हा परिषदेत कामे घेऊन जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी इतर दिवशी नोकरीच्या ठिकाणी दिवसभर थांंबण्याच्या सूचना दिल्याचे नवाल यांनी सुनावले. (प्रतिनिधी)
दोन ग्रामसेवकांवर कारवाई
By admin | Updated: October 17, 2024 12:52 IST