याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील आदिवासी युगप्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठान संचलित यशोधरा बालगृहाचा चालक ईश्वर काळे याने त्याची पत्नी व सून यांच्या मदतीने काही बालकांना अवैधरित्या ताब्यात ठेवले होते. याबाबत बालकल्याण समितीने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मदतीने काळे याच्याविरोधात योग्य ती कार्यवाही सुरू केली होती. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ईश्वर काळे, त्याची पत्नी, सून व इतर दहा ते पंधरा जणांनी बालकल्याण समितीत येऊन समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, सदस्य प्रवीण मुत्याल, बालकल्याण अधिकारी (संस्थाबाह्य) सर्जेराव शिरसाठ, पर्यवेक्षक अशोक अळकुटे यांच्या अंगावर शाई फेकली. तसेच शिवीगाळ करत कार्यालयात मोडतोड करत जिवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात हनिफ शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी मात्र इतर कलमांमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचे कलम लावले नाही. वास्तविक बाल न्याय अधिनियम २०१५ मधील कलम २७ प्रमाणे बालकल्याण समिती गठित करण्यात येते. या समितीतील अध्यक्ष व चार सदस्य यांची नेमणूक राज्यपाल यांच्या आदेशाने होऊन त्यांना राजपत्रित अधिकारी, असा दर्जा दिला जातो. त्यामुळे या गुन्ह्यात कलम ३५३ चा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर हनिफ शेख, भाग्यश्री जरंडीकर, ज्योत्स्ना कदम, प्रवीण मुत्याल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.