पानसरे म्हणाले, आम्ही मोठ्या कष्टाने शेती पिकवतो. कांदा हे शाश्वत पैसे देणारे पीक आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी कांदा उत्पादन घेण्याचे ठरविले. मात्र शेतकऱ्यांची मागणी पाहून अनेक बीज कंपन्या व दुकानदारांनी बनावट बी शेतकऱ्यांना विकले. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली. महागड्या किमतीचे बी घेऊन शेतीची मशागत करून हे बी पेरले. मात्र सर्व बी हे बोगस असल्याने त्याची उगवण झाली नाही. जेथे उगवले त्या पिकास डोंगळे निघाले. यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले. आधीच कोरोना संकटामुळे शेतमालाला बाजार नसल्याने बेजार झालेल्या शेतकरी हा कांदा न उगवल्याने आणखीच अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणे अत्यंत गरजेचे आहे.
केंद्र सरकार तर हे शेतकरीविरोधीच आहे. अनेक दिवसांपासून दिल्लीच्या प्रवेशद्वारावर शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी सरकार भावनिक मुद्द्यांवर हात घालून तेढ निर्माण करत आहेत. म्हणून शेतकरी वर्गातून मोठा संताप व्यक्त होत असल्याची टीका भास्कर पानसरे यांनी केली आहे.
याचबरोबर याबाबत वेळोवेळी पंचायत समिती, कृषी विभागाचे अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली आहे. मात्र त्यांनी अतिशय बेजबाबदार उत्तरे देत शेतकऱ्यांनी ग्राहक मंचाकडे जावे, असे मोफत सल्ले दिले आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. अहमदनगर जिल्हा व परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी बी कंपन्या व दुकानदारांचा निषेध केला असून, याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.