अहमदनगर/कर्जत : आधार कार्ड काढण्यासाठी शुल्क आकारल्या प्रकरणी कर्जत तालुक्यात दोन महा ई सेवा केंद्रावर बुधवारी कारवाई करण्यात आली. ही केंद्र बंद करण्याचे आदेश उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत. त्यानंतर सदर केंद्र बंद झाले असून तेथील मशिनही जप्त करण्यात आल्या आहेत.निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी आनंदकर निवडणूक कामानिमित्त कर्जतला आले असता त्यांनी मिरजगांव येथील नितिन बनकर यांच्या केंद्रारला भेट दिली़ ते ग्राहक केंद्रात गेले व आधार कार्ड काढायाचे आहे, काय करावे लागेल, अशी माहिती चालकास विचारली़ त्यावर आधार्ड काढायचे असतील तर शंभर रूपये लागतीलए असे आनंदकर यांना सांगण्यात आले़ आधारकार्डसाठी शुल्क अकारल्याच्या कारणावरून आनंदकर यांनी मिरजगाव येथील केंद्राचा पंचानामा करून कारवाई करण्याचे आदेश दिले़ त्यानंतर ते पुढे कर्जत तहसीलसमोर असलेल्या टॉपर्स कॉम्प्युटरमध्ये ग्राहक बनून गेले़ तेथे त्यांना तसाच अनुभव आला़ त्यांना आधार कार्ड काढण्यासाठी शंभर रूपये मागितले. त्यानंतर त्यांनी ओळख सांगितली. ओळख सांगितल्यानंतर केंद्र चालक गडबडले़ आनंदकर यांनी तातडीने कर्जतचे कामगार तलाठी बळीराम पांडुळे यांना बोलावून आधार केंद्राचा पंचनामा केला. आनंदकर यांनी केलेल्या धडक कारवाईत मिरजगांव व कर्जत येथील आधार केंद्र चालकांचे पीतळ उघडे पडले असून, ही दोन्ही केंद्र बंद करण्यात आली आहेत. येथील मशिनही प्रशासनाकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईने महा ई सेवा केंद्र चालक धास्तावले आहेत तर सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांकडून कारवाईचे स्वागत होत आहे.
महा-ई सेवा केंद्रांवर कारवाई
By admin | Updated: June 23, 2016 01:24 IST