अहमदनगर : लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे़ जिल्ह्यातील २५ हजार पेक्षा जास्त गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून, यातील ९ हजार जणांना पोलिसांनी आतापर्यंत नोटीस पाठविली आहे़गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या दहा हजार जणांना निवडणूक काळात हद्दपार केले जाणार आहे़ पोलीस ठाणेनिहाय तयार झालेली गुन्हेगारांची यादी येत्या काही दिवसांतच हद्दपारीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे़केडगाव हत्याकांडाची पार्श्वभूमी लक्षात घेता लोकसभा निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे़ तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते़ ही यादी तयार झाली असून, पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया सुरू आहे़हाणामारी, खून, अवैध व्यवसाय, दंगल करणे, संघटित गुन्हेगारी, अपहरण गौणखनिज तस्करी आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्यांवर हद्दपारी व इतर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे़पोलीस व महसूल प्रशासनाने रमजान, गणेशोत्सव, अहमदनगर महापालिका निवडणूक व श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीदरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हद्दपार केले होते़ याच पद्धतीने आताही कारवाईची मोहीम जोरात राबविण्यात येणार आहे़नेत्यांसह कार्यकर्तेही पोलिसांच्या रडारवरकार्यकर्त्यांना घेऊन राडा करणाऱ्या जिल्ह्यातील विविध पक्षातील अनेक नेत्यांची नावे पोलिसांच्या हद्दपारीच्या प्रस्तावात आहेत़ यातील बहुतांशी नेत्यांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत़ त्यामुळे पोलिसांच्या तावडीतून ना नेते सुटणार ना कार्यकर्ते़लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे़ याचाच एक भाग म्हणून निवडणूक काळात गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे़- ईशू सिंधू, जिल्हा पोलीस अधीक्षक
जिल्ह्यात ९ हजार उपद्रवींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 13:13 IST