अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपीस जिल्हा न्यायालयात आणले, त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ कोपर्डी घटनेतील पहिल्यांदा ताब्यात घेतलेला आरोपी शिंदे हा गेल्या चौदा दिवसांपासून पोलीस कोठडीत होता़ या काळात आरोपीने पोलिसांकडे त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे़ मात्र, उर्वरित तपास, घटनास्थळाचा आरोपीसमवेत पंचनामा आणि इतर पुरावे एकत्र करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीत दोन वेळा वाढविण्यात आली होती़ या घटनेचा तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने चार दिवसांपूर्वी आरोपीस कोपर्डी येथील घटनास्थळी नेऊन पंचनामाही केला होता़ गुरुवारी आरोपीची चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश आऱएम़ पांडे यांनी आरोपीला ९ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती़ या आरोपीवर न्यायालय परिसरात दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी गुरुवारी मोठा बंदोबस्त तैनात केला होता़ आरोपीला घेऊन येणारे वाहन थेट न्यायालयाच्या दारात उभे करण्यात आले होते. सुनावणी अवघ्या पाच मिनिटात झाल्याने त्याला तातडीने न्यायालयाबाहेर नेण्यात आले़ दरम्यान या घटनेत पोलिसांच्या ताब्यात असलेले संतोष भवाळ व नितीन भैलुमे या आरोपींची पोलीस कोठडी शनिवारी संपणार आहे़ (प्रतिनिधी)आरोपी जितेंद्र शिंदे याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याला सबजेलमध्ये नेण्यात आले होते़ मात्र, तेथे जागा नसल्याने आरोपीला कर्जत येथील कारागृहातच ठेवण्यात येणार आहे़
आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By admin | Updated: July 29, 2016 17:48 IST