अहमदनगर : जळगाव येथील जय श्री दादाजी फाउंडेशनसह इतर संस्थांची १ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथून अटक केली. अविनाश अर्जुन कळमकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मायभूमी ग्रामविकास संस्थेचा सचिव आहे.
कळमकर याने जय श्री दादाजी फाउंडेशनसह इतर १८० कंपनी केंद्रचालकांना सीएसआर फंडामधून अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून नीती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवत त्यांची १ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. याबाबत योगिता उमेश मालवी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात (जि. जळगाव) दिलेल्या फिर्यादीवरून कळमकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा जळगाव आर्थिक गुन्हे शाखा तपास करत होती. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून कळमकर हा फरार होता. जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप पाटील हे पथकासह नगर येथे कळमकर याचा शोध घेण्यासाठी आले होते. कळमकर हा त्याच्या गावी देठणे गुंजाळ येथे आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. या माहितीनुसार सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, पोलीस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, कॉन्स्टेबल मयूर गायकवाड, प्रकाश वाघ आदींच्या पथकाने आरोपीस अटक करत जळवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
फोटो ०८ एलसीबी
सव्वा कोटीची फसवणूक करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.