बोधेगाव : मुंबईतील विधानभवन सभागृहात नुकतेच अभिरूप युवा संसदेचे सादरीकरण पार पडले. यामध्ये विभागीय स्पर्धेतून शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील अमोल गणपत डोईफोडे या युवकाची खासदारस्वरूपी संसद म्हणून निवड झाली होती. त्याने आक्रमक अन् अभ्यासू अशी विरोधी पक्ष गटनेत्याची भूमिका साकारून शेवगावचा आवाज दिल्ली दरबारी गाजवला आहे.
वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि युवक बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने अभिरूप युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह यांच्या संकल्पनेतील या उपक्रमासाठी परीक्षक म्हणून निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, अर्थतज्ज्ञ तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, आशुतोष शिर्के आदी उपस्थित होते.
औरंगाबाद येथील एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अमोल डोईफोडे याची निवड झाली. या स्पर्धेत लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान ते खासदार, मंत्री, संसदीय सचिव आदी सर्व भूमिका युवकांनीच साकारल्या. यात अमोलने विरोधी पक्ष गटनेत्याची भूमिका साकारून कोरोना काळातील सरकारची जबाबदारी, जनतेच्या हालापेष्ठा, उपासमारी, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षाला जाब विचारत लक्ष वेधले.
फोटो ओळी २२ अमोल डोईफोडे
मुंबई येथील विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात अभिरूप युवा संसदेत विरोधी पक्ष गटनेत्याची भूमिका साकारताना अमोल डोईफोडे व इतर सहकारी.