अहमदनगर : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदावरून सोमवारी नाट्यमय राजकीय घडामोडी झाल्या. रविवारी दुपारी घनशाम शेलार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदावर तासाभरात पक्षाने काशिनाथ दाते यांची निवड झाल्याचे कळविले. मात्र हा निर्णय फिरवण्यात आला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चेअंती माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या नावाची घोषणा पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी सोमवारी केली.ानशाम शेलार यांनी रविवारी जिल्हाध्यक्षपदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेवर पारनेरचे काशिनाथ दाते यांच्या नावाची घोषणा रविवारी झाली. सोमवारी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले जाईल, असे पक्षाकडून माध्यमांना कळविण्यात आले. मात्र या पदावरुन कमालीच्या वेगवान घडामोडी घडल्या. काकडे यांनी तातडीने पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक राष्ट्रवादी भवनात सोमवारी घेतली. या बैठकीपूर्वी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर ही चर्चा पवार यांच्या कानावर घातली. त्यानंतर अभंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती पुढे आली आहे. काल दाते यांच्या निवडीची माहिती माध्यमांना देणारे काकडे यांनीच सोमवारी अभंग यांच्या निवडीची घोषणा राष्ट्रवादी भवनातील मेळाव्यात केली. (प्रतिनिधी)पडद्याआड...दाते यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याने राष्ट्रवादीतील पारनेरचा सुजित झावरे गट अस्वस्थ झाला होता. झावरे यांनी प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांच्यासह निवडक कार्यकर्त्यांसोबत सोमवारी सकाळीच पुणे गाठले. तेथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर पिचड यांना नगरला पाठवले. पक्ष निरीक्षक काकडे यांनी तोपर्यंत जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा केली. पिचड आल्यानंतर त्यांनीही जिल्ह्यातील ज्येष्ठांशी चर्चा केली. गटातटाचे राजकारण नको म्हणून अभंग यांचे नाव समोर आले. दादा कळमकर, राजेंद्र कोठारी यांचीही नावे चर्चेत होती. परंतु पवार यांंनी अभंग यांच्या नावाला संमती दर्शविली.
नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हाध्यक्षपदी अभंग
By admin | Updated: June 24, 2014 00:06 IST