श्रीगोंदा : श्रीगोंदेकरांनी सुरू केलेल्या संत शेख महंमद महाराज कोविड सेंटरमधील ९० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये घोगरगाव येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे.
श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. कोविड सेंटर सुरू करण्यासाठी नेते मंडळींनी फारसा रस दाखविला नाही. मात्र ग्रामीण भागातील तरुणाईने एकत्र येत कोविड सेंटर सुरू केले. त्यावर शहरातील व्यापारी सतीश बोरा यांनी कोविड सेंटरसाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले. संत शेख महंमद महाराजांच्या नावाने कोविड सेंटर सुरू झाले. अनेक मदतीचे हात पुढे आले. या कोविड सेंटरमध्ये सेवाभावी वृत्तीने उपचार आणि भोजन यांची व्यवस्था करण्यात आली.
येथे डॉ. अभिषेक प्रसाद बागूल,
डॉ. अजय राजेंद्र घोरड, अभय कुडवे, प्रमोद भारस्कर, विनय वाघमारे, सागर चवतमाल, राजेंद्र ढवळे, मयूर गडादरा, अजय इंगळे, राजेश ताटे, स्नेहा शिंदे यांनी स्वयंसेवक म्हणून खांद्यावर धुरा घेतली. दहा दिवसात ९० रूग्णांनी कोरोनावर मात केली.
घोगरगाव येथील एकाच कुटुंबातील पाच जण कोरोना बाधित आढळले होते. त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. कोठे जायचे, कोठे उपचार घ्यायची अशी विवंचना होती. त्यांना अशा परिस्थितीत संत शेख महंमद महाराज कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला सर्वजण घाबरले होते. त्यांना कोविड सेंटरमध्ये आधार देण्यात आला. पाचही रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या कोविड सेंटरमध्ये ४१ रुग्ण उपचार घेत आहेत.
----
आमच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोना झाला. दवाखान्यात दाखल करण्यासाठी पैसे नव्हते. संत शेख महंमद महाराज कोविड सेंटरमध्ये दाखल केले. डाॅक्टरांनी चांगले उपचार केले. दोन टाईम मोफत जेवण, चहा दिला. घरातील माणसाप्रमाणे सेवा केली. यारूपाने आम्हाला संत शेख महंमद महाराज भेटले. सेवेबद्दल शब्द अपुरे आहेत.
-सुनीता तरटे,
घोगरगाव
----
१४ श्रीगोंदा कोविड सेंटर
श्रीगोंदा येथील कोविड सेंटरमधील डॉक्टर, इतर सहकारी.