लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यालयीन पदे व शिक्षक अशी एकूण ७५ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत असून, गटशिक्षणाधिकारी हे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असून, राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे.
कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गावे आहेत. या गावांत १६९ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या सर्व शाळांचा कारभार पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून चालतो. हा कारभार पाहण्यासाठी कार्यालयात गटशिक्षणाधिकारी १, विस्तार अधिकारी २, केंद्रप्रमुख ७, शालेय पोषण आहार अधीक्षक १, डाटा एंट्री ऑपरेटर १, वरिष्ठ लिपिक दोन, तर शालेय स्तरावरील मुख्याध्यापक १३, पदवीधर शिक्षक २०, तर उपमुध्यापक २८ अशी ७५ पदे रिक्त आहेत. सद्या कोरोनामुळे जरी शाळा बंद असल्यातरी ऑनलाइन अध्यापनाचे काम सुरूच आहे. तसेच शालेय शिक्षणाबरोबरच कार्यालयीन माहिती गोळा करणे, शाळांना भेटी देणे, शालेय स्तरावरील कामकाजाची दैनंदिन माहिती घेणे अशी कामे सुरूच आहेत. मात्र, अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी तसेच शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
..
तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदांसंदर्भात वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे याविषयी शासनस्तरातून कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे अजूनही रिक्त पदांचा गंभीर विषय लक्षात घेता. या जागा भरण्यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी व्हावी. अन्यथा २३ तारखेला होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत या विषयावर आवाज उठवू.
- राजेश परजणे, शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद, अहमदनगर
....
गेल्या दोन वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील भरतीप्रक्रिया बंद होती. परंतु, येत्या काही दिवसात भरतीप्रक्रिया सुरू होऊन या रिक्त जागा भरतील अशी अपेक्षा आहे.
- सचिन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कोपरगाव