-----------
चंद्रकांत शेळके
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : यंदा दहावीचा रेकॉर्डब्रेक निकाल लागल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) विद्यार्थी पसंती देत आहेत. जिल्ह्यात आयटीआयच्या एकूण ७ हजार २० जागा असून, त्यासाठी आतापर्यंत अडीच हजार अर्ज आले आहेत. मागील वर्षी प्रतिसादाअभावी ३९ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा मात्र मागील वर्षीपेक्षा जास्त प्रवेश होतील, असा विश्वास आयटीआय विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दहावीचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. नगर जिल्ह्यात १६ शासकीय व २८ खासगी अशा एकूण ४४ आयटीआय आहेत. त्यात एकूण ७,०२० (२,८८८ शासकीय, ४,१३२ खासगी) जागा असून, आतापर्यंत नगर जिल्ह्यासाठी ॲानलाइन २,३६८ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील स्थानिक ९० टक्के विद्यार्थ्यांना, तर इतर जिल्ह्यांतील १० विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव असणार आहे. यंदा दहावीचा निकाल जास्त लागल्याने आयटीआयला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-----------------
एकूण किती जागा - ७,०२०
आतापर्यंत आलेले अर्ज -२,३६८
जिल्ह्यातील शासकीय संस्था - १६
जागा - २,८८८
खासगी संस्था - २८
जागा - ४,१३२
-------------
सर्वांनाच हवा ‘इलेक्ट्रिशन’
आयटीआयमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी सर्वाधिक पसंती इलेक्ट्रिशन, वायरमन ट्रेडला देत आहेत. कारण स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या अनुषंगाने हा ट्रेड फायदेशीर ठरतो. याशिवाय नोकरीच्या अनुषंगाने विद्यार्थी टर्नर, फिटर, मशिनिस्ट या ट्रेडला पसंती मिळत आहेत.
-------------
मी आयटीआयसाठी अर्ज केला असून, मला ‘इलेक्ट्रिशन’ ट्रेड घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे. शासकीय संस्थेत मला प्रवेश मिळेल, याची खात्री आहे.
- प्रवीण जोशी, विद्यार्थी
------------
मला आयटीआयला प्रवेश घ्यायचा आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून, कागदपत्रांची जमवाजमव सुरू आहे. कंपनीत नोकरीच्या अनुषंगाने फिटर ट्रेडला मी पसंती देणार आहे.
समर्थ पंडित, विद्यार्थी
---------
नगर जिल्ह्यात शासकीय व खासगी अशा एकूण ४४ आयटीआय असून, तेथे ७०२० जागा आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआयच्या जास्त जागा भरतील, अशी शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या वेबसाइटवर भेट देऊन अर्ज भरावा.
- सुनील शिंदे, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर
-------------गतवर्षी ३९ टक्के जागा रिक्त
मागील वर्षी आयटीआयच्या शासकीय व खासगी अशा एकूण ७,०२० जागांपैकी ४,२८६ जागांवर प्रवेश झाले होते. म्हणजे २,७३४ जागा (३९ टक्के) रिक्त राहिल्या होत्या. यंदा आयटीआयला जास्त प्रवेश होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.