अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुर जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत ५०० मीटरच्या आता असलेल्या ८२५ पैकी ७०० हॉटेल, बिअरबार व मद्यविक्री दुकानांचे शनिवारी शटर डाउन झाले. उत्पादन शुल्क विभागाने न्यायालयीन आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत जिल्ह्यात दिवसभर तपासणी मोहीम राबविली.
जिल्ह्यातील वाईन शॉप, हॉटेल आणि बिअरबार चालकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने आधीच नोटीस बजावून १ एप्रिलपासून परवान्याचे नूतनीकरण केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी जिल्ह्यात सर्वत्र तपासणी मोहीम राबवून हायवेलगत असलेल्या हॉटेलचालकांकडे शिल्लक असलेले मद्य सिल करून त्यांच्याकडे सुपूर्त केले़ उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीशिवाय हे मद्य विक्री करता येणार नाही़ या हॉटेलचालकांना आता पर्यायी जागा पहावी लागणार आहे़ जिल्ह्यात महामार्गालगत असलेल्या हॉटेल, बारमधून होणा-या मद्यविक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते़ ही उलाढाल आता बंद होणार आहे़ नेवासा तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्ग व शेवगाव -श्रीरामपूर राज्यमार्गावरील रस्त्यापासून ५०० मीटरच्या आतमध्ये असलेली हॉटेल सकाळी काही वेळ सुरू होती़ उत्पादन शुल्क अधिका-यांनी तपासणी मोहीम सुरू केल्याची समजताच ही हॉटेल तत्काळ बंद करण्यात आली.
नगर शहरातील १२५ हॉटेल, बार बंद
नगर शहरात नगर-औरंगाबाद रोड, नगर-मनमाड रोड, नगर-पुणे रोड ते नगर-कल्याण रोडवर व नगर-सोलापूर रोडवरील १२५ हॉटेल, बार व मद्यविक्री शॉप बंद झाले आहेत. यातील बहुतांशी हॉटेल हे राजकीय नेत्यांची आहेत.
श्रीरामपूर विभागातील ७४ दारु दुकाने बंद
श्रीरामपूर विभागातील देशी, परदेशी दारुविक्री करणारी १५ दुकाने, ५१ परमिट रुम व ८ बिअर शॉपी सील केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक डी. बी. लगड यांनी दिली.
कोपरगाव-कोल्हार दरम्यान ६० दुकाने सील
अहमदनगर-मनमाड महामार्गावरील कोपरगाव व राहाता तालुक्यांतील एकूण ६० परवानाधारक मद्यविक्री दुकाने शनिवारी सील करण्यात आली. कोपरगाव ते कोल्हार दरम्यान असलेले १ वाईन शॉप, ५ बियर शॉपी, ९ देशी दारू दुकाने, ४५ परमीट बार व परमीट रूमची तपासणी करुन एकूण ६० परवानाधारक मद्यविक्री दुकानांना सील लावण्यात आले.