अहमदनगर : नगर शहरात ५७४ अनधिकृत धार्मिकस्थळे असल्याचे महापालिकेने गुरूवारी जाहीर केले. २००९ नंतर बांधलेली धार्मिकस्थळे निष्कासित केली जाणार आहे. अनधिकृत धार्मिकस्थळांमध्ये पाइपलाइन रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिर, पावन गणपती मंदिर तसेच अन्य मंदिरे, मस्जिद, दर्गा, चर्च तसेच जैन स्थानकाचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याने त्याचे पालन करणे हे महापालिकेला बंधनकारक आहे. त्यामुळे ही कारवाई करताना महापालिकेची मोठी कसरत होणार आहे. २८ सप्टेंबर २००९ नंतर बांधलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत कारवाई करण्याबाबतचा कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. महापालिकेने शहराच्या विविध भागातील धार्मिक स्थळांचा सर्व्हे केला आहे. त्यात ५७४ धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या अनधिकृत धार्मिक स्थळांची प्रारुप यादी महापालिकेने प्रसिध्द केली आहे. त्यात संत अण्णा चर्च, जैन श्रावक संघ, यासह छोटी मंदिरे, मस्जिद, दर्गा, पीर, देवी मंदिरांचा समावेश आहे. २००९ पूर्वीची बांधकामे नियमित करणे, शक्य झाल्यास त्याचे स्थलांतर करणे किंवा निष्कासित करणे असे कार्यवाहीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी मालकी हक्काचा उतारा, मंजूर रेखांकन/मोजणी नकाशा, धार्मिक स्थळांचे बांधकाम झाल्याचे वर्ष निश्चित करण्याकरीता सरकारी पुरावा, धार्मिक स्थळाचे नकाशे, विकास योजना प्रस्ताव दर्शविणारा भाग नकाशा, जमीन मालकांची संमती ही कागदपत्रे घेऊन संबंधितांनी महिनाभराच्या आतमध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल करावा. शासन निर्देशानुसार ते नियमित करणे, स्थलांतरित करणे किंवा निष्कासित करणे याची कार्यवाही केली जाणार आहे. बहुतांश बांधकामे ही नियमित करता येणार नसल्याचा अभिप्राय महापालिकेच्या नगररचना विभागाने दिला आहे. त्यामुळे ही बांधकामे काढताना महापालिकेची मोठी कसरत होणार आहे. (प्रतिनिधी)
शहरात ५७४ अनधिकृत धार्मिक स्थळे!
By admin | Updated: June 9, 2016 23:38 IST