विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहाराची योजना अमलात आणली. या योजनेतून नगर जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण ४५४७ शाळांमधून शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. या शाळांपैकी ३९९८ शाळांकडे आहार शिजवण्यासाठी गॅस कनेक्शन आहेत; मात्र जिल्ह्यात अजूनही ५५९ शाळा अशा आहेत ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही आणि येथील पोषण आहार चुलीवर शिजवला जातो. प्रामुख्याने दुर्गम भागातील अकोले तालुक्यात अशा सर्वाधिक शाळा आहेत. आहार शिजविताना अशा शाळांतील कर्मचाऱ्यांना चुलीतून निघणाऱ्या धुराचा सामना करावा लागत आहे. या धुरावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने आता शालेय पोषण आहार चुलीवर शिजविणाऱ्या शाळांना गॅस कनेक्शन देण्याचे ठरविले आहे. दोन महिन्यांपूर्वी शिक्षण संचालक कार्यालयाने गॅस कनेक्शन नसलेल्या शाळांची माहिती व प्रस्ताव मागवले आहेत. नगर जिल्ह्यातील ५५९ शाळांना गॅस कनेक्शन दिले जाणार असल्याने या शाळा धूरमुक्त होणार आहेत.
-------------
जिल्ह्यातील एकूण शाळा - ४५४७
गॅस जोडणी नसलेल्या तालुकानिहाय शाळा
अकोले ११७
संगमनेर १
कोपरगाव ३५
श्रीरामपूर ४६
राहाता १३
राहुरी १६
नेवासा ६०
शेवगाव १०
पाथर्डी ७७
कर्जत १३
जामखेड १०
श्रीगोंदा. ६५
पारनेर ६२
नगर १
नगर महापालिका २३
-----------------------
एकूण. ५५९
------------
पोषण आहार शिजविण्यासाठी ज्या शाळांकडे गॅस कनेक्शन नव्हते अशा जिल्ह्यातील ५५९ शाळांची माहिती शासनाकडे पाठवली आहे.
- गुलाब सय्यद, शिक्षणाधिकारी प्राथमिक