अहमदनगर : विविध कारणामुळे बहुतांशी तरुण गुन्हेगारीच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. येथील जिल्हा कारागृहात सध्या १०१ न्यायाधीन बंदी असून यापैकी ५० टक्के बंदी हे १८ ते ३० या वयोगटातील आहेत. २९ जणांवर खुनाच्या गुन्ह्याचा आरोप आहे तर उर्वरित कैद्यांवर विविध स्वरुपातील गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा कारागृहात एक ते दोन महिन्यांची सजा झालेले अथवा न्यायालयीन कोठडीत असलेले बंदी ठेवलेले जातात. ६३ बंदीवान ठेवण्याची कारागृहाची क्षमता आहे. येथे मात्र नेहमीच क्षमतेच्या दोन ते तीनपट बंदीवानांची संख्या असते. सध्या कारागृहात १०१ पैकी एकही महिला बंदीवान नाही. खून, दरोडा, लूटमार, हाणामारी, फसवणूक, चोरी आदी गुन्ह्यात अटकेत असलेले हे बंदीवान आहेत. यातील काही जण हे सराईत गुन्हेगार नाहीत मात्र घरगुती वाद अथवा शुल्लक कारणातून हातून गुन्हा घडला अन् जेलमध्ये दाखल झाले. बहुतांशी जण पैसे कमविण्यासाठी गुन्हेगारीकडे वळले तर काही मित्रांमुळे गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले. अशा वेगवेळ्या परिस्थितीतून आलेले हे बंदीवान आहेत.
.....................
कारागृहात बंदीवानांचे समुपदेशन
विविध गुन्ह्यामुळे कारागृहात दाखल झालेले बंदी येणाऱ्या आयुष्यात पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नयेत यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत यांनी सांगितले. समुपदेशन, योगा तसेच चांगले आयुष्य कसे जगावे यासाठी व्याख्याने व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध शिबिरे आयोजित केले जातात. या उपक्रमांचे बहुतांशी बंदीवांनावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे सावंत यांनी सांगितले.
जिल्हा कारागृहात १०१ कैदी
१८ ते ३० वयोगटातील कैदी- ५०
३१ ते ५० वयोगटातील कैदी-३०
५१ पेक्षा वयाचे कैदी- २०
...............
३० टक्के खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी
एकूण बंदीवानांपैकी ३० टक्के बंदीवान हे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. यातील काही जण हे सराईत गुन्हेगार आहेत तर काही जणांच्या आयुष्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीच्या गुन्ह्यातील बंदीवानांची संख्या जिल्हा कारागृहासह इतर ठिकाणीही सर्वाधिक आहे.
फोटो २१ सबजेल