अहमदनगर : जिल्ह्याला मिळालेले ४९ लाख ९४ हजार वृक्षलागवडीचे उद्दिद्द यावर्षी निश्चितपणे साध्य होईल. त्यासाठी नियोजनाप्रमाणे प्रत्येक यंत्रणांनी आताच कामाला लागावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियोजनाचा आढावा द्विवेदी यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, वन विभागाचे उप महावनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भोसले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम यांच्यासह कृषी, शिक्षण, पाटबंधारे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.राज्यात वनआच्छादन वाढवण्यासाठी वन विभाग, ग्रामपंचायत, इतर शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था आणि लोकसहभागातून तीन वर्षांत एकूण ५० कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्यासाठी ४९ लाख ९४ हजार इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, दिनांक १ ते ३१ जुलैदरम्यान आपल्याला संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबवावयाची आहे. त्यासाठी प्रत्येक यंत्रणांनी आतापासूनच कामाला लागावे. सध्या जिल्ह्यात ४३ लाख ६ हजार इतके खड्डे तयार आहेत, उर्वरित खड्डे खोदण्याचे काम संबंधित यंत्रणांनी पूर्ण करावे.
जिल्हाभरात यंदा ५० लाख वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 17:33 IST