आदिनाथ वसाहत येथे किरण चव्हाण यांचा बंगला आहे. या बंगल्याला दोन दरवाजे आहेत. एका दरवाजाला कुलूप लावलेले होते. तर दुसऱ्या दरवाजाला आतून कडी लावून चव्हाण कुटुंबीय झोपलेले होते. ८ मार्चला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी भिंतीवरून उडी घेत आत प्रवेश केला. ज्या दरवाजाला कुलूप लावलेले होते. ते तोडून आतमधील रूममध्ये असलेल्या कपाटाची उचकापाचक करत कपाटाच्या आतल्या लॉकरमध्ये ठेवलेले २ तोळे सोन्याची अंगठी, १ तोळ्यांची अंगठी तसेच दीड तोळ्याचे मिनी गंठण असा एकूण ५ तोळ्यांचा मुद्देमाल लंपास केला.
किरण चव्हाण यांना आवाज येताच त्यांनी बाहेर येऊन बघितले तर एक चोरटा पळताना दिसला. त्यानंतर आपल्या रूममध्ये सहज बघितले तर सर्व सामान उचकपाचक अवस्थेत तर कपाटातील सोने गेल्याचे आढळून आले. चोरी झाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी एकत्रित होऊन शोध घेतला. मात्र, चोरटे पसार झाले. चव्हाण यांच्या बंगल्यातील चोरीची माहिती समजताच राहुरी पोलिसांनी येऊन पंचनामा केला. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया उशिरापर्यंत सुरू होती.