अहमदनगर : कडधान्यांचे उत्पादन दरवर्षी घटत असून, उत्पादकता वाढविण्याचे मोठे आव्हान कृषी विभागापुढे आहे़ त्यामुळे या वर्षी कृषी विभागाच्यावतीने ५ हजार हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचनातून तुरीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे़ यातून १ लाख २५ हजार हेक्टर तुरीचे उत्पादन करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली़नगर जिल्ह्याचे सरासरी तुरीचे क्षेत्र १२ हजार हेक्टर आहे़ तर उत्पादकता एका हेक्टरसाठी २७१ किलो म्हणजे तीन क्विंटलपर्यंत आहे़ उत्पादकता कमी असल्यामुळे क्षेत्र वाढूनही तुरीचे उत्पादन कमी येत आहे़ त्यामुळे तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने ठिबक सिंचनाचा वापर करुन ५ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे़ त्यासाठी प्रत्येक कृषी सहाय्यकास १० हेक्टरवर तूर लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे़ अकोला जिल्ह्यात एका शेतकऱ्याने ठिबक सिंचनाचा अवलंब करुन एका हेक्टरमध्ये ३३ क्विंटल उत्पादन घेण्याचा विक्रम केला होता़ त्याच धर्तीवर नगर जिल्ह्यातही तुरीचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे़ मागील वर्षी एका हेक्टरमध्ये ३ क्विंटल इतके नगण्य उत्पादन हाती आले होते़ ते आता २५ क्विंटलपर्यंत वाढविण्याचे टार्गेट ठेवले असल्याचे बऱ्हाटे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
ठिबक सिंचनावर घेणार ५ हजार हेक्टर तूर
By admin | Updated: June 2, 2016 23:09 IST